आजोबांचा लेख








अतिप्राचीन कालापासून भारतीय संस्कृति ‘अद्वैत’सिद्धान्तावरच आधारलेली आहे. ‘एकमेवाद्वितीयम्’ हेंच मूलतत्त्वाचें स्वरूप! सृष्टि म्हणजेच जग हें अनन्त भेदांनी भरलेलें आहे – म्हणजेच द्वैतमय आहे हें प्रत्येक जीव सतत अनुभवीत आहे. त्यामुळेंच द्वैत खरें कीं अद्वैत खरें असा प्रश्न विचारी व्यक्तीला सतावूं लागला तेव्हां ज्ञात्यांनी निर्णय दिला कीं –

‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ जशी एकच वस्तु किंवा व्यक्ति संबंधभिन्नत्वामुळें किंवा दृष्टीचा कोन बदलतांच भिन्न दिसूं लागते – एकच स्त्री – कन्या, पत्नी, माता, आते, मावशी, बहीण- अशा अनेक शब्दांनी बोलली जाते – तसेंच ‘एकं सत्’ विप्र म्हणजे विद्वान् (विद्यया याति विप्रत्वम्) नाना प्रकारांनी वर्णितात.

एकच अनेक कसें बनतें वा भासतें किंवा बोललें जातें याचा विचार करणाऱ्या सोपपत्तिक सिद्धान्ताला ‘दर्शन’ म्हणतात. अशीं त्या-त्या द्रष्ट्या ऋषींनी दीर्घकाळ चिंतनानें अनेक दर्शनें प्रकट केलीं आहेत. त्यांनाच शास्त्रें असेंही म्हणतात. अर्थात् या सर्व दर्शनांचे किंवा शास्त्रांचे मूळ ‘वेद’ हेंच आहे. ‘विदन्ति येभ्यः ते वेदाः’ – सर्वविध ज्ञान ज्यांतून मिळूं शकतें ते वेद! सर्व विद्या या वेदवृक्षाच्या शाखा आहेत – त्यामुळें त्यांत परस्परविरोध दिसत असला तरी तो आधाराच्या एकत्वाला पूरकच ठरतो. दिवस-रात्र अगदीं विरुद्ध असलीं तरी त्यांचा जनक सूर्य एकच! प्रत्येक विद्याशाखेनें आपापली विचारधारा पूर्णत्वाला नेली आहे, प्रमाणांनी सुस्थिर केली आहे आणि त्यांत खंडनमंडनात्मक खूप निर्मिले आहेत - ग्रंथ!

हा सर्व ग्रंथविस्तार शब्दमय असल्यामुळे शब्दशास्त्राला मोठें महत्त्व दिलें आहे. ‘मुखं व्याकरणं प्रोक्तम्’ हें वचन प्रसिद्धच आहे. सबंध शरीरांत जें चेहऱ्याला महत्त्व असतें तेवढेंच महत्त्व सर्व विद्यांत शब्दशास्त्राला म्हणजेच व्याकरणाला आहे. मीं व्याकरणाचार्य आहें, त्यामुळें इतर दर्शनांपेक्षां ‘व्याकरणदर्शन’ द्वैताद्वैताबद्दल काय दिशा दाखवितें तें मीं थोडक्यांत सांगण्याचा प्रयत्न करणार आहें.

व्याकरणशास्त्राचे प्रक्रियाग्रंथ आणि प्रकरणग्रंथ असे दोन भेद आहेत. भगवान् पाणिनि, कात्यायन आणि पतंजलि या मुनित्रयानें – सूत्र, वार्तिक आणि भाष्य या क्रमानें ग्रंथरचना करून असंख्य शब्द कसें तयार करावे त्या प्रक्रियेचा विचार केला आहे. भाष्यकार म्हणतात- ‘चतुष्टयी शब्दानां प्रवृत्तिः – नामाख्यातोपसर्गनिपाताः।’ नाम-आख्यात-उपसर्ग आणि निपात ही शब्दसृष्टीची पहिली चौकडी! या चारांपासूनच अब्जावधि, अनंत शब्द बनत असतात. हा व्याकरणशास्त्राचा द्वैतप्रपंच! ह्याचें महत्त्व भाष्यकारांनी ‘एकः शब्दः सम्यक् ज्ञातः सुष्ठु प्रयुक्तः स्वर्गे लोके कामधुग् भवति’ असें वर्णिलें आहे. द्वैतसृष्टींत स्वर्गप्राप्ति हेंच ध्येय! तें या व्याकरणशास्त्राच्या अध्ययनानें व उपयोजनानें मिळू शकणार आहे, म्हणून ‘व्याकरणमधीष्व’ हा विधि – यज्ञादिविधींप्रमाणें ‘प्रवृत्तिधर्माचा’ निदर्शक आहे.

 आतां या शब्दशास्त्राच्या तत्त्वज्ञानविषयक प्रकरणग्रंथांचा विचार पाहूं.  शब्द अर्थात् ध्वनि हाच सर्व चराचर जगाचा पहिला आविष्कार! भौतिक सृष्टींतील पहिलें महाभूत आकाश - आणि त्याचें सूक्ष्मरूप  = ‘तन्मात्रा’ शब्द! ध्वनि हा घर्षणानें, आघातानें निर्माण होतो. म्हणून ‘स्फोट’ हें पुढील सर्व स्थूल शब्दसृष्टीचें मूळ! हेंच अनादि, अनन्त – शब्दतत्त्व - ‘सत्’!

याबद्दल ‘वाक्यपदीय’ या ग्रंथांत भर्तृहरीनें म्हटलें आहे कीं –

‘अनादिनिधनं ब्रह्म शब्दतत्त्वं यदक्षरम् । विवर्ततेऽर्थभावेन प्रक्रिया जगतो यतः’।।१।।

हें शब्दब्रह्मच अर्थरूपानें, वस्तुरूपानें भासमान होतें कीं ज्यापासून पुढें अनंत जगताची प्रक्रिया = विस्तार पसरत जातो. ज्याप्रमाणें प्रत्येक व्यक्तिला बोलण्याची इच्छा होतांच जठराग्नि आणि प्राणवायु यांच्या संयोगानें  ‘परा’वाक् उत्पन्न होते. तिचा हृदयांत ‘पश्यंती’, कंठांत ‘मध्यमा’ आणि शेवटीं मुखांत ‘वैखरी’  असा विकास होऊन ती श्रवणेन्द्रियाचा विषय बनते. त्याचप्रमाणें ‘सत्’ वस्तूला झालेली ‘बहुस्यां प्रजायेय’ ही स्फूर्तिच ‘स्फोट’ या वाक्शक्तीला प्रकट करते. ही सूक्ष्मवाक् – ध्वननि आणि ध्वनिलहरी या क्रमानें वस्तुनिर्मितीला कारणीभूत होते. अशा रीतिनें संपूर्ण विस्तार हें द्वैत आणि त्याचें मूळ ‘शब्दब्रह्म’ हें एकरूप, निरवयव, स्वयंभू, अविनाशी ‘अद्वैत’! या शब्दाची व्यापकता आणि नित्यता महर्षींनी ‘स च एको विभुर्नित्यश्च’ या शब्दांनी वर्णिलें आहे. या शब्दतत्त्वाचा अनुभव, साक्षात्कार हाच मोक्षदायक! या स्फोटवादाचें विवरण - ‘वाक्यपदीय’, ‘स्फोटवाद’, ‘लघुमञ्जूषा’, ‘पातंजलमहाभाष्य’ वगैरे अनेक ग्रंथ लिहून द्रष्ट्यांनी सप्रमाण मांडलें आहे. महर्षि कणाद (वैशे.), महर्षि कपिल (सांख्य), पतंजलि (योग), जैमिनी (पूर्वमीमांसा), आणि श्रीमच्छंकराचार्य यांनी सांगितलेली दर्शनें देखील व्यवहारासाठी द्वैत आणि मोक्षासाठीं ‘अद्वैत’ असेंच आपापल्या विद्याशाखेचें ‘तत्त्व’ व्यक्त करतात.

-          पं. पु.ना. फडकेशास्त्री, रत्नागिरी

Comments