वंदन करू प्रथम देव गजानन



 ‘वंदन करू प्रथम देव गजानन’...


कार्तिकातल्या उत्सवात लक्ष्मीकांताच्या देवळात आरत्या झाल्या की भोवत्यांना सुरुवात व्हायची ती ह्या पदाने. फिक्क्या निळ्या रंगाचा, बाह्या दुमडून घेतलेला फुलशर्ट, कॉलरच्या बरोबरीने गळ्यात नाहीतर खांद्यावर टाकलेला तांबडा छोटा पंचा, हाफपँट असा वेश असणारे शिरुभाऊ भोवत्यांची पदं सांगत. आधी ते म्हणणार आणि नंतर फेर धरलेले सगळे म्हणणार. तोंडात कायम पान, त्यामुळे ओठ नेहमी रंगलेले. डोक्याचं टक्कल नि त्याला काळ्यापांढऱ्या केसांची झालर. बेताची उंची. रंग तरुणपणी गोरा, पण वय झाल्यावर काहीसा रापल्यावर जसा दिसतो तसा. बारीक, मिचमिचे डोळे. पोट थोडं पुढे आलेलं.

जोपर्यंत ‘भू’ला होतो, तोपर्यंत दर वर्षी शिरुभाऊंना देवळात उत्सवाचे पाच दिवस नक्की पाहिलंय. त्याशिवाय दुकानावर किंवा दवाखान्यात अगदीच कमी वेळा पाहिलंय. माझे वडील पशुधनपर्यवेक्षक. पण त्यांना डॉक्टरची सगळी कामं करावी लागत, कारण तिथे कोणाची नियुक्तीच झाली नव्हती. गुरांना घेऊन दवाखान्यात येणारे लोक चहा न घेता जात नसत. त्यामुळे ‘हे अमके’ असं माहीत असे. पण शिरुभाऊंना तिथेही फारसं आलेलं पाहिलं नाही. माझी त्यांच्याशी ओळख असण्याचं कारण काहीच नाही. मी लहान होते तेव्हा, त्यांच्याशी बोलायला कशाला जाणार? पण गावातले सगळे लोक एकमेकांना माहीतच असतात, तसे तेही मला माहीत आहेत.

मग लक्षात का राहिले ?

भू आडगाव नव्हतं, पण तिथे करमणुकीची साधनं काही फारशी नव्हती. टीव्ही होता घरात, रेडिओ होता. पण ती ‘करमणुकीची साधनं’ बनली नव्हती. त्यामुळे वर्षात एकदा होणारा श्री देव लक्ष्मीकांताचा उत्सव हा अतीव आकर्षणाचा विषय होता ... आणि आहे. कीर्तनासकट. कारण मग जास्त वेळ देवळात थांबायला मिळे. उत्सवाला जाण्यासाठी आम्हा दोघा भावंडांना आणि आईला बरीच दिव्यं करावी लागत. तेवढी किंमत मोजल्यावर जगातल्या कोणत्याही गोष्टीची महती वाढतेच.

कधी एकदा आरत्या संपून भोवत्या सुरू होतायत असं व्हायचं. भोवत्यांची सुरुवात व्हायची ‘वंदन करू प्रथम...’ शिरुभाऊंच्या आवाजाने. त्यामुळे शिरुभाऊ अजूनही लख्खं आठवतात. त्यांचा आवाज, हातातली झांज, पानाचा चढलेला रंग... आणि ते पद !

मागच्या वर्षी इथे पुण्यात पुण्याई सभागृहात कोतापूरच्या मंडळींनी उत्सवाचा कार्यक्रम सादर केला होता. तेव्हा हे पद सुरू झालं नि डोळ्यात पाणीच आलं. व्यक्तिगत संबंध आला नसला तरी लहानपणातल्या एका छान काळाशी संबंधित व्यक्ती आहेत ते. अशा काळातली आठवणीत राहणारी हर एक गोष्ट, व्यक्ती अत्तराच्या कुपीसारखी असते. असते भूतकाळातली, पण आठवेल तितक्या वेळा वर्तमान दरवळून टाकणारी.

शिरुभाऊंचं घर नक्की कुठे ते माहीत नाही. माझी मैत्रीण सुवर्णा हिची मावशी त्या घरात दिलीय असं मला वाटतं, तसं असेल तर तिच्या घराच्या समोरच नदीपलीकडे गेल्यावर त्यांचं घर आहे ... आठवतं ते इतकं अंधुक नि त्यामुळे अनिश्चित असलं तरी लहानपणच्या पार्श्वभूमीवर शिरुभाऊंना मनात एक जागा आहे. माझ्या मनाच्या माजघरात छोट्या-मोठ्या, पण अगदी खऱ्या आठवणींच्या ज्या फोटोफ्रेम्स् आहेत ना, त्यात एक फ्रेम शिरुभाऊंची पण आहे!

२९.०३.२०२०

-          सुप्रिया महाजन.

१३.०४.२०१९


Comments