स्वतंत्रतेचे उपनिषद


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांस विनम्र अभिवादन.

जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे !
स्वतंत्रते भगवति ! त्वामहं यशोयुतां वन्दे
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूची आकाशीं होशी
स्वतंत्रते भगवति ! चांदणी चमचम लखलखशी
वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे ।।१।।
गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवति ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूची
स्वतंत्रते भगवति ! अन्यथा ग्रहण नष्टतेची
वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे ।।२।।
मोक्ष-मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदान्ती
स्वतंत्रते भगवति ! योगिजन परब्रह्म भजती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवति ! सर्व तव सहचारी होते
वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे ।।३।।
हे अधमरक्तरंजिते सुजनपूजिते श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे ।।४।।

भारताचं स्वातंत्र्य हेच जीवनध्येय असलेल्या क्रांतिकारकाच्या प्रतिभेतून उतरलेलं हे शब्दब्रह्म आहे. गीत म्हणून त्याचा विचार करताना त्यातली भारतीय स्वातंत्र्याच्या मूर्त रूपाची कल्पना, शब्दसौंदर्य, अत्युत्कट भावना ह्या गोष्टींचा पदोपदी प्रत्यय येतो, दर्शन घडतं. पण त्यापलिकडे ह्या गीतात काय आहे असा विचार केल्यावर जे जाणवतं ते केवळ असामान्य आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाची, प्रगल्भ वैचारिक परंपरेची बैठक असणाऱ्या ह्या कवीला त्याने आत्यंतिक इच्छिलेल्या ‘देशाच्या स्वतंत्रते’ची आणि ‘जीवाच्या मुक्ती’ची संकल्पना एकच आहे असं हृदयांतरी जाणवल्यावर जन्मलेलं हे काव्य आहे. लौकिक बंधनातून सुटका आणि जीवाला संसारबंधनातून मुक्ती ह्या दोन कल्पनांपैकी विराट् कल्पना निवडायला सांगितली तर कोणीही दुसऱ्या कल्पनेकडे निर्देश करेल. अलौकिकाच्या तुलनेत लौकिक गोष्ट नेहमीच खुजी दिसते. पण स्वा. सावरकरांच्या मनातली भारतभूच्या स्वातंत्र्याची ओढ अत्युत्कट आहे, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग असामान्य आहे, आणि त्या एकाच ध्येयासाठी त्यांनी अविरत श्रम घेतले हे निरपवाद आहे, त्यामुळे देशाचं स्वातंत्र्य, ती मुक्ती लौकिक असली तरी हे काव्य वाचणाऱ्या आपल्याला ती तत्त्वज्ञानातल्या उदात्त मोक्षकल्पनेला तुल्यबळच वाटते ! हा केवळ कविप्रतिभेचा चमत्कार नाही, तर कवी स्वा. सावरकरांच्या आमरण अविचल राहिलेल्या कर्मनिष्ठेचं तपोबल आहे. ते उत्तम कवी असल्याने उत्तम शब्दसंहती झाली हे खरं, पण आपल्यासारख्या स्वातंत्र्योत्तर काळात जन्मल्याने त्या धगधगत्या काळाची आच न लागलेल्या सामान्य लोकांनाही त्या शब्दांमधून ज्या स्वातंत्र्याच्या ऊर्मीचा ऊष्म स्पर्श होतो, तो ती भावना त्या कवीने जगलेली असल्यामुळे होतो.
भारताच्या स्वातंत्र्याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भावना काय होती असा प्रश्न कोणाला पडला असेल तर ... इथे आहे त्याचं उत्तर
मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती...
त्यांच्या मते, भारताचं स्वातंत्र्य ही एक स्वयंभू गोष्ट आहे. ती कोणाकडे मागण्याची वस्तू नाही, आणि कोणी ती देऊ पण शकत नाही. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्य, जे जे उत्तम उदात्त उन्नत... ह्या सगळ्या शब्दसंहती बघा! त्यांनी स्वतंत्रतेला ‘साक्षात् चैतन्य’ म्हटलं, सूर्याच्या तेजाची-समुद्राच्या अथांगतेची म्हणजेच पर्यायाने लौकिकदृष्ट्या मोजता न येणाऱ्या तेजस्वी आणि गूढ गोष्टींशी स्वतंत्रतेची तुलना केली, तिला कोणत्याही मापाने मोजता येत नाही असं म्हटलं. भारतीय विचारपरंपरेत अशी वर्णनं आत्मतत्त्वाची, मूळ चैतन्याची केलेली आढळतात. ते उदात्त आहे, उच्च आहे, प्रत्यक्ष चैतन्य आहे, ते मिळवण्यासाठी जन्म घ्यावा, ते नाही उलगडलं तर जन्माला मरणाचीच कळा येते... ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’... आणि पुढे - ‘तुज सकल चराचर शरण’ हे विधान तर ‘सगळं चराचर जगत् आत्म्याच्या अधिष्ठानावर भासते’ ह्या औपनिषदिक विचाराचंच कथन आहे.
ही माझी कल्पना नाही. कारण सावरकर ह्या पद्यात स्वच्छ सांगताहेत - मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे ... ’ वेदान्तशास्त्रात, म्हणजेच उपनिषदांत योगिजनांनी परब्रह्म कोणाला म्हटलंय ? मोक्ष, मुक्ती म्हणजे नेमकं काय असं सांगितलंय? परब्रह्म म्हणजे आत्मा. ज्याला ‘मी आत्मा आहे’ असं कळलं तो मुक्त होय. उपनिषदांमध्ये केवळ आत्मा स्वतंत्र म्हटला गेला आहे. ज्याचं ज्ञान दुसऱ्या कोणी करवून होत नाही, तो स्वतः स्वतःचं रूप योग्य व्यक्तीपुढे प्रकट करतो. खरं तर तो अव्यक्त आहे, त्याचे गुण सांगता येत नाहीत. तरी उपनिषदांत, ज्ञानी लोकांनी आत्म्याच्या वर्णनासाठी स्वतंत्र वगैरे शब्द वापरलेत ते वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या मनुष्याला कळावं म्हणून. बद्ध जीवाला ‘मी बद्ध आहे’ असं कळलं तर बंधनाचा त्रास होतो, तरच तो सुटकेचे, मुक्तीसाठीचे प्रयत्न करतो. स्वातंत्र्य त्याच्यासाठी ‘परम’ असतं. तसं जनतेला स्वतः परतंत्र असल्याची जाणीव झाली तरच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ती प्रेरित होते. तिने एकजुटीने केलेल्या प्रयत्नांना यश येतंच, स्वातंत्र्य मिळतंच.
उपनिषदांत वर्णिलेली जीवाच्या बाबतीतली ती अज्ञानाची गुलामगिरी, तर ही परकीयांची गुलामगिरी होती. जसं मुमुक्षूला केवळ आत्मदर्शनाची, अज्ञानातून मुक्तीची आस असते, इतर सुखांची कसलीच ओढ त्याला वाटत नाही, तसं ज्याला राष्ट्राच्या स्वातंत्र्याची ओढ लागली होती तो क्रांतिकारकही दुसऱ्या कशातच अडकला नाही. गुलामगिरीतले, इंग्रजांच्या चाकरीतले, त्यांची मर्जी राखणाऱ्या नोकरीतले ऐषोआराम, सुरक्षितता, धन, ... कशाकशाचाच मोह पडला नाही. भारताच्या स्वातंत्र्याची प्राप्ती हेच एकमेव उद्दिष्ट, एकमेव प्राप्तव्य!
सावरकरांचं अखंड आयुष्य असंच गेलेलं दिसतं. भारतीय विचारप्रणालीत कर्ममार्ग आणि मोक्षमार्ग असे दोन भिन्न मार्ग आहेत असे जरी दिसत असलं तरी शास्त्रात मोक्षाच्या प्राप्तीसाठी कर्माचरणाचा उपदेश दिलेला असल्यामुळे कर्ममार्ग हा साधनस्वरूप आहे. मोक्ष ही मुख्य गोष्ट आहे. स्वतःचं आयुष्य त्या विचारानेच जगणाऱ्या सावरकरांनी भारतीय-स्वातंत्र्यरूप मुक्ती मिळवण्यासाठीच प्रत्येक कृती केली. मोक्षप्राप्तीइतकीच भारतीय स्वातंत्र्याची, दास्याच्या बंधनातून जन्मभूमीच्या मुक्तीची प्राप्ती, त्यासाठीचे प्रयत्न उदात्त आहेत असं त्यांचं मत आहे आणि ते ह्या गीतातून प्रकट होतं.
अमूर्त मोक्षकल्पना आणि (त्यामानाने मूर्त, किंवा दृश्य) स्वातंत्र्यकल्पना एकाच गीतात येताना कुठेतरी निर्गुण-सगुणाचा संधि (=  सांधा) दिसणं अपेक्षित होतं, तसा तो ‘तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’ ह्या ओळीत मला दिसतो. बाकी सारं काव्य एक तर अमूर्ताकडे नाहीतर मूर्ताकडे झुकतं, पण ही ओळ म्हणजे त्या दोहोंना जोडणाऱ्या कवीच्या आर्त मनाची दाटून आलेली उत्कटता आहे. त्याच्या मनात तो तत्त्वज्ञानाने मिळणारा स्वयंभू मोक्ष आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर लौकिकातही प्रत्येक जीवाचा स्वतंत्र असण्याचा उपजत हक्क त्याला कळतोय, परतंत्र असल्याची लज्जास्पद बोचही आहे, स्वतंत्र होण्याची लसलसती आच आहे आणि डोळ्यासमोर भारतभूची परबंधनात जखडलेली मूर्ती आहे.... ती त्याची जन्मभूमी, प्राणापेक्षा प्रिय जन्मभूमी... ‘तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’ ...
सावरकरांमधला कवी, क्रांतिकारक, ज्ञानी एकरसून ह्या गीता उतरलाय. त्यांनी स्वातंत्र्याची नि मोक्षाची एकत्र मांडणी केलीय असं पुनःपुनः विचार केल्यावरही ठाम वाटतं. कृतकृत्यता म्हणजे जे-जे मी करण्यासारखं होतं ते-ते सगळं मी केलं याची खात्री असलेल्या माणसाला कर्मपूर्तीने मिळणारं समाधान आहे. ते मिळालेल्या मनुष्याला आयुष्याची हाव उरत नाही. तो मुक्तीकडे वाटचाल करतो. मरणाची भीती तशा माणसांना वाटत नाही. ती माणसं मरणाला मोक्षद्वार बनवतात. जे सावरकरांनी केलं. त्यांनी प्रायोपवेशन केलं. जगण्याची आसक्ती न उरल्याने त्यांनी तो निर्णय घेतला. आसक्ती न उरणं हा गुण आहे. अनासक्त मनुष्य ‘इदं न मम’ म्हणून त्या-त्या गोष्टीचा सहज त्याग करतो. तसा त्यांनी जीवनाचा त्याग केला, देहापासून आत्म्याची म्हणजे स्वतःची मुक्ती, स्वातंत्र्य मिळवलं. त्यातून स्वातंत्र्याची व्यापक कल्पना खरोखरच त्यांच्या मनात पूर्वीपासूनच प्रस्फुरत होती असं दिसतं.
 ‘हे अधमरक्तरंजिते सुजनपूजिते’ ही ओळ त्यांनी आत्यंतिक इच्छिलेल्या केवळ भारतीय-स्वतंत्रता-देवीच्या वर्णनाची आहे. राष्ट्राचं स्वातंत्र्य काही दुष्टनिवारणाशिवाय आणि सुजनांच्या प्रयत्नांशिवाय मिळणारं नाही. स्वातंत्र्यदेवी ही अधमरक्तरंजित आणि सुजनपूजित आहे. अनेकांच्या एकाग्र आणि प्रमादरहित प्रयत्नांनी ती प्रसन्न होणार आहे. ती प्रसन्न झालेला मनुष्य म्हणजे स्वतंत्र मनुष्य. त्याच्या चेहऱ्यावर काही वेगळंच तेज विलसतं. व्यवहाराच्या आणि तत्त्वदर्शनाच्या किंवा अध्यात्माच्या क्षेत्रात जर कोणाचा पूर्ण सुखी, पूर्ण आनंदी म्हणून उल्लेख केला असेल तर ते मुक्त मनुष्याचं, जर कोणाच्या चेहऱ्यावरच्या तेजाचं वर्णन केलं असेल तर ते फक्त स्वतंत्र, मुक्त मनुष्याच्या तेजाचं! पुष्कळ कपडालत्ता, चारी ठाव जेवण, नोकरचाकर, पोरंबाळं वगैरे सगळी सुखांचीच यादी आहे, पण व्यवहारात ती दुःखदात्रीही आहेत आणि अध्यात्मात तर केवळ दुखदात्रीच मानली जातात. पण केवळ स्वातंत्र्य हे एकमेवच असं आहे जे लौकिक आणि अलौकिक अशा दोन्ही क्षेत्रांत निरपवाद महत्त्वाचं आहे.
हे खरं आहे की हे गीत स्वा. सावरकरांना भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या अतूट इच्छेने स्फुरलं. पण ते तेवढ्यापुरतं सीमित नाही. एकूणच जीवजाताच्या उपजतच स्वतंत्र असण्याचा उद्घोष आहे हा ! हे कोणत्याही देशाच्या सीमेवर न संपणाऱ्या स्वतंत्रतेचं उपनिषद आहे!

-         सुप्रिया महाजन
दि. २६.०२.२०२०

Comments

  1. apratim rachana aahe hi. tuzya bhardasta, pravahi shabdani tyatalya vicharancha gabha ujalun takala. masta supriya

    ReplyDelete
  2. Kup chhan... Shabdanche antar phodun kavitecha saar manala bhedun takanarya sabadanmadhe uttam ritya madala aahe... Apratim...

    ReplyDelete

Post a Comment