श्यामल



त्या संध्येचा आठव श्यामल, श्यामल म्हणजे काळा नाही
आर्द्र घनाची रसाळ आभा, श्यामल म्हणजे काळी नाही

घरी निघाया सरावलेली त्याच दिशेने वाट निघाली
परी जिवाची आज कळेना अज्ञाताला ओढ बिलगली

विस्मयकारी महाभूत ते आकाशातुन खाली येते
आसमंतही तया भेटण्या पिसे लागल्यापरी अधिरते

चुटकीसरशी घेतो गिरकी जोरावरती येतो वारा
पाचोळा जणु मुक्त होउनी ऊर्ध्वगतीने निघे भरारा

वाऱ्यावरती झोकून देते सारे स्थावर अपुले तन-मन
थबकून बिचकून लपते भित्रे आडोशाला जग जे जंगम

अशा मुहूर्ती धाक सोडुनी खुल्या नभा सामोरे जावे
उचंबळूनी भुतास भिडण्या  वृत्तींनाही खुले करावे

ती संध्याही अशीच आली काळोखीच्या नेपथ्यावर
छन्न सूर्यही कडेकडेने बनला मेघकिनारी झालर

ऊर्ध्वमूल तो तरू कुणीशा घनश्यामलाने कथिलेला
दिसे जणू तो आतुर झाला तप्त पृथेला शांतवण्याला

किती दूर जे दिसे एरवी गगन आपणा ..अगणित अंतर
त्या संध्येला परी इथे ..हे ..! घालित चित्तावरती मंतर

संध्या म्हणता म्हणता गगनी अशी घनांची झाली दाटी
तमोबलाने एकावुनिया नुरे काहीही दुजे शेवटी

कुलवंताच्या घरचे देणे, भरून जावी मूठ आपली
हे तर भगवंताच्या घरचे... भिजून गेली पृथ्वी सारी

त्या संध्येचा आठव श्यामल ... मनात घुमतो पुन: पुन्हा जरी..
आठवते ना अजूनही मज होते तेव्हा मी कोठे परी?

- सुप्रिया आशिष महाजन


Comments

  1. खूप छान सुंदर ।

    ReplyDelete
  2. संस्कृत मधल्या सामासिक शब्दांची ताकद किती अलगदपणे उतरली आहे....सुंदर!

    ReplyDelete
  3. व्वा... क्या बात है

    ReplyDelete

Post a Comment