मनुष्यमात्र


सकाळी कॉलेजला येताना आयुर्वेद रसशाळेजवळ कर्वे रस्ता ओलांडला, पुढे छोटा टेम्पो होता, भाजीचा. हे भाजीचे टेम्पो खूप दिसतात रोज सकाळी. मार्केट यार्डवरून भाज्या करेदी घेऊन विकायला आपापल्या ठिकाणी नेतात. त्या भाज्यांच्या हाऱ्यांमध्ये नि पोत्यांच्या थप्पीत जागा करून घेऊन एकमेकांशी गप्पा मारणाऱ्या किंवा मग मागच्या गाड्यांकडे वगैरे बघतपणे विशेषतः विक्रेत्या बायका बसलेल्या असतात. आजही होत्या ... नाही... नाही, आज टेम्पोत भाजी विकायला घेऊन जाणारे चार तृतीयपंथी बसलेले होते. एकमेकांशी बोलत होते. जवळपास २०० मीटर रस्ता माझी गाडी त्या गाडीमागे होती. ते बोलण्यात मग्न होते, त्यांचं लक्ष पण नव्हतं कोणाकडे. मला मात्र त्यांच्याच कडे बघत रहायला झालं. कारण अजून एक गोष्ट वेगळी दिसली होती. चौकात दिसणाऱ्या तृतीयपंथीयांच्या चेहऱ्यावरचं भाव त्या चार चेहऱ्यांवर नव्हते, ती चार भाजी विकणारी माणसं होती. 
मला अचानक रडूच यायला लागलं. आज सकाळी प्रथमच मी तृतीयपंथी ‘मनुष्य’ पाहिला. 
वयाच्या १८-१९व्या वयापर्यंत मी तृतीयपंथी, हिजडा पाहिलाच नव्हता. शहरात दिसतात तसे गावांमध्ये दिसत नाहीत हिजडे. रत्नागिरीत शिक्षणासाठी आले तेव्हा एकदा एस्. टी. स्टॅण्डवर पाहिला. कसंच तरी वाटलेलं. आकृती, हालचाली, हावभाव ... त्याचे नि त्याच्याकडे पाहून इतरांचे ... सगळंच ओंगळवाणं वाटलेलं. नंतर जितक्या वेळा मला हिजडे दिसले तितक्या वेळा याहून फारसं वेगळं काही वागले नाही. 
लग्नानंतर ट्रेनचा प्रवास करण्याची वेळ आली नि ती टाळी ऐकल्यावर परत भीती नि अंग चेरून बसणं वगैरे सुरू झालं. माझ्या नवऱ्याने त्यावर आक्षेप घेतला. ‘त्यांनी काय केलंय तुला? ते जे काही करतात तो त्यांच्या उपजीविकेचा मार्ग आहे. ते शक्यतोवर बायकांकडे पैसे मागत नाहीत आणि त्यांच्या जवळ पण जात नाहीत. नाही ना आले तुझ्यापाशी? तुझ्याकडे मागितले का पैसे? हिजडे आहेत म्हणजे काय आहेत? बाई आणि पुरुष ह्याशिवाय काहीतरी वेगळे आहेत. पण ते जे काही वेगळं आहे, त्याचा तुझ्याशी काही संबंध आहे का ? मग तुला काय करायचंय तो स्त्रीलिंगी नाही आणि पुंल्लिंगी पण नाही याच्याशी?’ माझ्याकडे काहीही उत्तर नव्हतं. 
माझ्याकडे उत्तर नाही हे मला जाणवलं आणि मग अपराधी वाटलं ... ‘मनुष्य आहे म्हणजे एक तर बाई असावं नाहीतर पुरुष असावं असं हिजड्यालाही वाटत असणार, मग ह्या दोन लिंगात जन्मलेल्या मनुष्यांना वाटण्यात चूक काय ? तर, काही नाही. पण बाई किंवा पुरुष नाही तरी ‘तो मनुष्य आहेच’ हे मी अगदीच लक्षात का नाही घेत? तो तृतीयलिंगी आहे ह्याच्याशी खरंचच माझा काय संबंध? ज्यांना मी ओळखते आणि जे स्त्री किंवा पुरुष ह्या स्वच्छ विभागणीत कोणत्या तरी एका विभागात निश्चितपणे उभे राहू शकतात त्या कोणाच्या लैंगिक आयुष्याचा प्रश्न मला पडलाय आजपर्यंत? जो माझा जवळचा मित्र आहे, तो पुरुष आहे म्हणून त्याच्याशी मैत्र नाही जुळलं. तसंच सख्ख्या मैत्रिणीच्याही बाबतीत. इतक्या जणांशी रोजचा संबंध येतो त्यातल्या कोणाशी मी ते स्त्री किंवा पुरुष आहेत म्हणून बोलते अगर बोलत नाही?’ खूप प्रश्न पडू लागले, खरेपणाने त्यांची उत्तरं स्वतःकडनं घेतली तेव्हा स्वतःचीच दया येईल अशा गोष्टी जाणवल्या. 
आता इतक्या वर्षांनी कळतंय खरं तर, तेव्हाही हिजड्यांची भीती नव्हती वाटत, कोणत्याच लिंगाने ओळखता न येणाऱ्या त्यांच्या तुलनेत स्त्री म्हणून स्वतःला ओळखणं किती सुरक्षित आहे आणि त्यामुळे मी किती गौरवशाली आहे असं इतर सर्वांना दाखवण्याची धडपड होती ती. समोरचा मनुष्य हिजडा असण्यात आणि मी स्त्री असण्यात आमचं दोघांचंही काहीही योगदान नसताना त्याचा एकाला केवढा त्रास आणि एकाला केवढे फायदेच फायदे ! 
आशिषमुळे मी ज्या बऱ्याच गोष्टींमध्ये माझा स्वतःचा दृष्टिकोन मिळवू शकले त्यातली ही एक गोष्ट, हिजडा हा मनुष्य असतो आणि मी पण मनुष्य आहे. त्यामुळे जेव्हा वेळ येईल तेव्हा माझा त्याच्याशी व्यवहार मनुष्यवत् असावा हे माझं मला कळलं. चौकात दिसणाऱ्या, टाळ्या वाजवून, विचित्र हेलकावत पैसे मागणाऱ्या हिजड्यांकडे लक्ष जातंच, पण ते पेन-पेन्सिली विकणाऱ्या पोराटोरांकडे जसं जातं तेवढंच जातं. त्यांचे हावभाव वगैरे त्यांच्या पैसे मिळवण्याची साधनं म्हणून मी मान्य केली आहेत. मनुष्य म्हणून प्रगल्भ होतानाचा हाही एक टप्पाच होता असं पुढे गेल्यावर कळून येईल मला पण तो टप्पा मी प्रामाणिकपणे स्वतःहून आणलाय. 
जरी इतकं झालं तरी आज सकाळी त्या चौघांना मी पाहिलं तेव्हा ते ‘हिजडे’ आहेत हेच मी पाहिलं. पण त्यांच्या चेहऱ्यावर इतर अनेक भाजीविक्या बायांच्या चेहऱ्यावरचेच गप्पा मारतानाचे हावभाव दिसले आणि प्रथमच मला कळलं की ती सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर चौकात दिसतात त्याहून वेगळे, अगदी तुमच्या-माझ्या सारखे भाव येतात... कारण ते तुमच्या-माझ्याप्रमाणेच आहेत. ते चौघंजण ‘आज कोणती भाजी कशी मिळाली, कसा फायदा होईल’ असंच काहीतरी बोलत जात असणार न ? घाऊक भाजी घेऊन किरकोळीत विकायला चाललेली चार सामान्य माणसं एकमेकांत दुसरं काय बोलणार? 

- सुप्रिया आशिष महाजन


Comments

Post a Comment