शांत



शांत

‘तेल आहे ना पुरेसं ?’ निघताना मला सासुबाईंनी विचारलं.
‘हां, आत्ताच घातलंय. रात्रीपर्यंत पहावं नाही लागणार. मी काल रात्री अगदी भरून ठेवलेला दिवा. पण सकाळीसुद्धा फारसं संपलेलं नव्हतं अहो ... फारच पुरतंय.’
‘हो ना...’
बाबांच्या नावाने लावलेला दिवा पण कसा बाबांसारखाच शांत तेवतोय !
कै. डॉ. शरद महाजन, जबलपूर
निघताना झालेला तो संवाद मनात खूप आठवणी जाग्या करून गेला.

माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी सीमान्तपूजन झालं. सगळा कार्यक्रम उरकल्यावर हॉलच्या मध्यभागी मी आणि बाबा गप्पा मारत बसलो होतो. मला जरासुद्धा अवघडलेपण नव्हतं की मी माझ्या सासऱ्यांशी गप्पा मारतेय, पण ह्यांच्या हिंदीभाषिक मित्रांना महदाश्चर्य वाटलं की, ‘यार, ऐसा कैसे हो सकता है?’ लग्नानंतर अर्धं आयुष्य संपलं तरी सासू-सासऱ्यांसमोर घुंघटमध्ये राहणाऱ्या त्यांच्या बायका होत्या. ते चूक की बरोबर हा मुद्दा नाही, पण तेच ‘संस्कार’ आहेत असं त्यांच्याकडे पक्कं मानतात, त्या पार्श्वभूमीवर होणारी सून आणि सासरे भर मंडपात गप्पा मारतात हे झेपणार कसं?
बाबा साहित्यातले डॉक्टर आहेत असं मला वाटलेलं. पण त्यादिवशी गप्पा मारताना कळलं की ते होमिओपॅथी आणि नॅचरोपॅथीचे डॉक्टर होते. बाबा लेखक आहेत, त्यांची कवितांची वगैरे पुस्तकं आहेत; पत्रकार होते, स्वतःचं एक वर्तमानपत्र काढत होते; ज्ञानेश्वरीवर वगैरे प्रवचनं देतात असं सगळं मला माहीत होतं. त्यामुळे ‘का नाही केली पीएच्.डी.?’ असा अनावश्यक प्रश्न मी केला. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर मला आजही चमत्कारिकच वाटतं! म्हणाले की, ‘मला काय उपयोग होता त्याचा ? तेव्हा चालू असलेल्या उपजीविकेत ह्या उपाधीचा उपयोग होणार होता म्हणून ती मिळवली. साहित्यातल्या डॉक्टरेटला मलाच पैसा खर्च करायला लागणार होता. माझा लेखनाचा छंद जोपासायला मला काय करायचीय मग पीएच्.डी.?’ ‘बाबांनी केवळ उपजीविकेसाठी डॉक्टरकी केली, मात्र छंदाच्या क्षेत्रात पैसे घालून ती करायची गरज वाटली नाही’ हा मुद्दा मला केवळ कंजूसपणाचा वाटला. पण त्यांच्या दृष्टीने तो व्यवहार होता आणि तो त्यांनी अनुसरला.... ते गेल्यावर आज समजतंय की, आपलं मत बनवणं, व्यावहारिकता समजणं खूप सोपं असतं, त्यानुसार वागायला खूप धैर्य लागतं. हा काय म्हणेल, तो काय विचार करेल ह्या विचारांनीच धैर्य गळून पडतं. साध्या सरळ व्यवहारातही स्वमतावर बाबा  ठाम राहू शकले आणि भावनिक बाबीतही. निरुपाय केल्यावर कोणाचं मन तोडलं नाही, पण ‘मला पटत नाही’ हे स्पष्ट सांगायला त्यांना भीड पडली नाही.
आई सांगतात की माझ्या आजेसासुबाई (बाबांच्या आई) गेल्यावर अस्थिसंकलनापासून काहीही धार्मिक विधी करण्याचं त्यांच्या मनात नव्हतं. त्यांचं त्यांच्या आईवर प्रेम होतं, तिची शेवटपर्यंत सर्वप्रकारे सेवाही त्यांनी केली, पण हे विधी करूनच तिला मुक्ती मिळेल हा मुद्दा त्यांना पटला नाही, केवळ सासुबाईंच्या अतीव आग्रहाखातर त्यांना ते सारं करणं भाग पडलं. पण ही वेळ जेव्हा बाबांच्या बाबतीत ठरवण्याची आली तेव्हा मात्र तोवर त्यांच्या स्वतंत्र मतांचं कौतुक सांगणाऱ्या आम्हाला कोणालाही तसं वागण्याचं धैर्य झालं नाही. परंपरेच्या प्रवाहापासून दूर जाऊन वागावं लागलं तिथे असुरक्षितता वाटली.
असं का ? कारण बाबांनी जे-जे काही केलं, ते ‘त्यांना वाटलं’ म्हणून केलं, कोणी वंदेल म्हणून त्यांनी काही केलं नाही आणि निंदेल म्हणून एखादी पटलेली गोष्ट सोडली नाही. त्यांच्या ह्या स्वभावामुळे त्यांचे किस्से सांगून-ऐकून खूप हसलो आहोत आम्ही; ते कधी सुद्धा रागावले नाहीत. पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी करायला अवघड होत्या हे आज जेव्हा बाबा नाहीत तेव्हा लक्षात येतंय. ‘माझ्यासमोरची स्वतःची अगर दुसऱ्याची गरज, हौस, छंद पूर्ण करण्यासाठी कोणालाही न फसवता, काही हिरावून न घेता मला जो प्रयत्न करता आला तो मी केला’ इतका सरळ विचार त्यांनी केला आणि तसं वागलेही.
जसं स्वतःच्या मतांचं स्वातंत्र्य त्यांना निर्बाध ठेवायचं असे तसं ते इतरांच्याही मतांवर कधी स्वतःची सावली पडू देत नव्हते. साधं पत्ते खेळणं असो किंवा आमच्या घरात राष्ट्रीय खेळाइतकंच महत्त्व असलेली हौझी खेळायची असो, पैसे लावून खेळतात म्हणून सहभागी होणार नाही हा मुद्दा त्यांनी अगदी एकदाही सोडला नाही. लग्नानंतर आशिषच्या एका मित्राकडे जायचं होतं. त्यांचं नाव दुबे, शहरातलं राजकीय क्षेत्रातलं वगैरे मोठं नाव. त्यांच्याकडे जाताना नव्या सुनेने साडी नेसणंच गरजेचं. नाहीतर ते चमत्कारिक दिसेल असं आईंसारखंच आशिषचंही मत असावं. मला त्याची कल्पना नव्हती, पण मी साडीच नेसणार होते. नेमकं घोटाळा नको म्हणून आशिषने विचारलं, ‘तू काय घालणार आहे तिकडे जाताना?’ बाबा समोरच बसले होते. मी उगीचच गोंधळले. ते बघून बाबांनी आशिषला सरळ सांगितलं, ‘तिला कळतं काय करायचं ते, तिला जे नेसायचं ते ती नेसेल. त्यांच्याकडे साडी लागते म्हणून तिने साडीच नेसली पाहिजे असं नाही. आपल्याकडे तसा नियम नाही. तू तिला दडपण आणू नको.’ माझं स्वातंत्र्य मान्य करताना कदाचित् मी एखादा आधुनिक पद्धतीचाही पेहराव करू शकते, लोक खरंच नावं ठेवू शकतात हे कळत असून पण त्यांनी मला स्वतंत्रपणे ठरवायला मुभा दिली. जगाच्या दृष्टीने चूक असो वा बरोबर, जे मला पटलं ते मी वागेनच हे त्यांचं जीवनसूत्र होतं.
माझं नि आशिषचं लग्न झालं तेव्हा बाबांचं वय ७२ वर्षांचं होतं. निवृत्तीचीही बरीच वर्षं संपलेली. त्यामुळे आशिष सांगत असे तसे व्याख्यानं देणारे, सगळ्यांमध्ये रमणारे, अग्रेसर राहणारे वगैरे बाबा मी पाहिलेले नाहीत. मी अनुभवलेले बाबा सौम्य, शांत आणि आग्रही आहेत.
मागे त्यांच्या एका पुस्तकाच्या वेळी मी त्यांच्याशी खूप वाद घातला होता. त्यांनी त्या पुस्काचं स्वरूप बदलावं, भर घालावी इ. इ. खूप पटवून द्यायचा प्रयत्न मी केला. आई, आशिष पण वेगवेगळ्या कारणांनी त्यावरून आपआपली मतं मांडत होते. खरं तर संतापून ‘तुम्हाला काय करायचंय? मी बघेन ना माझ्या पुस्तकाचं काय करायचं ते!’ इतक्या साध्या पद्धतीने ते आम्हाला गप्प बसवू शकत होते. पण तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी त्यांचा आग्रह सोडला नाही, पण सौम्य भाषेत आमच्याशी प्रतिवाद करत राहिले.
दुसरा असाच एक प्रसंग. ते पुण्याला आले असताना त्यांच्या एका मित्राकडून (श्री. चंद्रशेखर पटवर्धन) एक पुस्तक आणायचं होतं. त्यांनी आशिषला आणायला सांगितलं. पण विसरण्यात आशिषचा हात कोणी धरू शकत नाही. सलग आठ-दहा दिवस तो रात्री घरी आला की बाबा विचारत, ‘आणलंस का पुस्तक?’ त्यावर तो काहीतरी कारण सांगे. शेवटी एक दिवस त्यांना आशिषची कारणावली ऐकून हसू आलं, पण शेवटपर्यंत ते चिडले नाहीत. एखाद्याने (म्हणजे मीच) आकाशपाताळ एक केलं असतं ... ते नुसते हसले! ते असताना मला ही गोष्ट कधी आठवली नाही, पण त्यांच्या मागे अशा छोट्या-छोट्या गोष्टींचं मूल्यच वेगळं ठरतंय.
आजकाल सहाध्यायी लोक संमेलनं ठरवतात. तशी जबलपूरला, पुण्याला महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचीही बरीच संमेलनं झाली. विद्यार्थी-प्रिय बाबांना त्यात आग्रहाचं निमंत्रण असे. कधीही न रागवणारे, मुलांच्या अडचणी, गरजा समजून घेणारे, त्यांच्याशी खेळीमेळीने वागणारे ‘महाजन सर’ मी पाहिले नसले तरी सौ. सुगंधा नाजपांडेसारख्या त्यांच्या विद्यार्थिनींकडून ऐकले मात्र आहेत.
बाबा ८६ वर्षांचं आयुष्य नातेवाईक, घरचे, परके, विद्यार्थी, मित्र, शेजारी वगैरे कोणालाही न दुखावता आणि तरीही स्वतःच्या मनासारखं, आनंदाने, समृद्धपणे जगले. घर चालवण्यासाठी निश्चित मिळकत हवी म्हणून आवश्यक तेवढी नोकरी केली आणि इतर वेळ स्वतःच्या छंदांना दिला. त्यातून पैसाही मिळवला आणि आनंदही. पिरॅमिड चिकित्सा, बाराक्षार चिकित्सा, चुंबक चिकित्सा, होमिओपथी, ज्योतिष, संतसाहित्य, ललितलेखन, अनुवाद, प्रवचन, व्याख्यान, पत्रकारिता, अध्यापन, सिनेमा, नाटक ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत ते रमले. कलाक्षेत्रातली यशवंत देव, जितेंद्र अभिषेकी, सुधीर भट, सुधीर फडके अशी महान मंडळी बाबांच्या सौम्य, शांत आणि तरी आकर्षक स्वभावामुळे घरपर्यंत आली, आईंच्या हातचं जेवून तृप्त झाली. जबलपूरमधल्या, बाहेरच्याही खूप संस्थांनी बाबांच्या विविधांगी व्यक्तिमत्वाचा गौरव केला. शेवटपर्यंत कोणत्या ना कोणत्या मंडळाशी त्यांचा संबंध राहिलाच. शेवटचे काही महिने उपस्थितीही जमणार नाही म्हणून महाराष्ट्र मंडळाचं अध्यक्षपद नको असं त्यांनी सांगितलं तरी मंडळाने त्यांना ‘तुम्ही हवेतच, आम्ही बाकी सगळं करून घेऊ’ असं सांगितलं. घरी कोणी भेटायला आलं नाही असे आठवड्याचे दिवस आईंना सांगता यायचे नाहीत, इतका संपर्क लोकांनी ठेवला. आजकाल कोणाकडेही द्यायला नसतो तो वेळ अनेकांनी वारंवार आईबाबांना दिला. जबलपुरातल्या परिचितांचं, आप्तस्वकीयांचं हे करणं इतकं अनौपचारिक होतं की त्यांचे आभार तरी कसे मानावेत?
आपलं अस्तित्व दाखवून द्यायचा आटापिटा करणाऱ्या जगात आपलं आयुष्य सुखाने, शांतपणे जगणाऱ्या बाबांसारख्या व्यक्तीकडे लोक आपसूकच आकर्षित होत असतील नाही ?
-            सौ. सुप्रिया आशिष महाजन
१५.१२.२०१९

Comments

  1. प्रवाही लिहीता. छान आहे

    ReplyDelete
  2. खूप सुंदर! श्रेयस कडून बाबां बद्द्ल खूप ऐकलं होतं, पण हा लेख वाचल्या नंतर मी आज पहिल्यांदा बाबांना जाणलं. त्यांच्या सारख्या 'idols' चा क्वचित अनुभव मिळतो आणि म्हणूनच त्यांचा आयुष्यातील मी एक चिमूटभर भाग होते ह्याचा मला खूप अभिमान आणि आनंद आहे. खूप खूप धन्यवाद लेख लिहण्या करता!

    ReplyDelete
    Replies
    1. प्राजक्ता, बाबा, तुझे आजेसासरे आणि माझे सासरे,... खरंच मोठे होते.

      Delete
  3. ती काकांची सून शोभतेस
    फार छान लिहिलं आणि कमी शब्दात् त्यांचं व्यक्तित्व बरोबर मांडलस
    साधुवाद

    ReplyDelete
  4. खुपच छान. मला आज एकदम शाळेतल्या दिवसांची आठवण झाली.. आमचे महाजन सर डोळ्यासमोर उभे राहिले. खुप छान वाटले.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment