मोहन







स्वयंपाकघरातला ‘मोहन’ हा शब्द कुकरी शोज्, वर्तमानपत्रातले पाककृतींबद्दलचे लेख अशा कारणांनी आता सर्वांनी ऐकलेला असतो... इतका की पुरुषांनाही माहीत असतो.
पीठ मळून त्यापासून ते पोळी, पुरी वगैरेंसारखे पदार्थ तयार करण्यासाठी अगोदर पीठ पाण्यात, दुधात भिजवावं लागतं. ते भिजवताना जे तेल, तूप घातलं जातं, त्याला ‘मोहन’ म्हणतात. हे मोहन घालण्याचे अनेक प्रकार आहेत. काहीजण-जणी पीठ भिजवून झाले की मोहन घालतात, तर काहीजण-जणी पिठात पाणी घालण्यापूर्वी तेल किंचितसं गरम करून, किंवा अगदी कडकडीत गरम करून ते घालतात. नंतरही म्हणजे पीठ मळतानाही ते घालावंच लागतं. पण अशा गरम करून वगैरे घातलेल्या मोहनाने पोळ्या, पुऱ्या वगैरे अगदी कशा अलवार होतात असं एक मत आहे. म्हणजे मोहन कधी घालावं याबाबतच नाही, तर ते मोहनसंज्ञक तेल कोणत्या तापमानाचं असावं याहीविषयी मतांतरं आहेत. 

हे एवढ्यावर थांबत नाही. मोहन तेलाचं की तुपाचं की लोण्याचं? की डालड्याचं ???? असं वाटलं होतं की, डालडा हा पदार्थ मध्यमवर्गीय घरांमधून हद्दपार झाला आहे. (उच्चभ्रू तर तेल-तूपही खाईनासे झालेत म्हणा ! अर्थात् त्यांची कारणं निराळी. ) पण नाही, कमीत कमी मोहन, साटं किंवा साटा या रूपांत तो टिकून आहे. नुसता टिकून नाही, तर ‘तेलातुपापेक्षा अशा पदार्थांना डालडाच चांगला’ अशा प्राधान्याने टिकून आहे. चिरोट्यासारखा पदार्थ करताना साटा लावतात. डालड्यात थोडा मैदा घालून तो फेटायचा. हा साटा. रघुनाथाच्या ‘भोजनकुतूहलम्’ या ग्रंथात ‘शालिचूर्णं घृतं तोयं मिश्रितं शकटं वदेत्’ (परिच्छेद )(तांदळाची पिठी, तूप व पाणी यांचं मिश्रण) असा करायला सांगितला आहे. साट्याला मोहन म्हणावं की नाही ते माहीत नाही, पण तो काम पदार्थाला खुसखुशीत करण्याचंच करतो आणि हमखास करतो. ढोकळा करताना डाळीच्या पिठात सोडा घालतात तो ढोकळा हलका व्हायला, पण ढोकळा मऊ, ओलसर व्हावा म्हणून तेलच घालतात. मग त्या तेलाला मोहन म्हणा – न म्हणा.

तर, मोहन तेलाचं की तुपाचं की लोण्याचं ? हा प्रश्न ‘आम्ही तरी अमकंच मोहन घालतो’, ‘पण माझी आई अमकं मोहन घालते आणि तेच छान वाटतं’, ‘अमक्या पदार्थाला अमकं मोहन चांगलं’, ‘अमक्या पुस्तकात अमकं मोहन घाला असं सांगितलं’, ‘माझा असा अनुभव आहे’ ... अशा विविध मार्गांनी सोडवला जातो.

तेलातुपाचा, लोण्याचा स्निग्धता हा गुण त्यांच्या ह्या उपयोगाला कारण आहे. तेल, तूप, लोणी हे पदार्थ जशी त्वचेमध्ये स्निग्धता आणतात, तशी मळलेल्या पिठातही आणतात आणि त्यामुळे त्या पिठाचे पोळी, पुरी, करंजी, शंकरपाळी, कचोरी, सांजोऱ्या, साजोऱ्या, चिरोटे, चकली, मोदक वगैरे जे काही पदार्थ करू, ते सारे मऊसर, म्हणजे मऊ पडलेले नव्हेत, तर खुसखुशीत होतात. त्यांचे पापुद्रे छान सुटतात, स्पर्श बदलतो आणि चवीत तर मोठाच फरक पडतो. एकूणच हे मोहन पदार्थाची आस्वादकता वाढवतं.

आपल्या देशात अनेक खाद्यसंस्कृती असल्याने मोहनाच्याही अनेक पद्धती असणार. पदार्थागणिक, व्यक्तिगणिक मोहन म्हणून वापरण्याची द्रव्यंही वेगवेगळी असणार. पण मोहनाविषयी कोणी काही शोध मात्र घेतलेला नाही. पाककृतींची बरीच पुस्तकं पाहिली, पण या मोहनाचा कोणी ‘विचार’ केलेला मात्र दिसत नाही. कणीक मऊसर रहावी म्हणून मोहन घालायचं हे अगदी सराईतपणे माहीत असल्याने तसं झालं असेल!

तर असं आहे हे मोहनविश्व.

आता जाता – जाता अजून एक माहिती ! मोहन असा जो शब्द आपण वापरतो, त्याचा दुसरा अर्थ करंज्या, मोदक इ. करताना आत घालतात ते गूळ, खोबरं आणि वेलची वगैरेचे सारण, पुरण असाही आहे. पण इतका वेळ हा शब्द ज्या अर्थाने आपण वापरतो आहोत, तो शब्दच मुळी ‘मोहन’ असा नाही !! 
खरा शब्द आहे ‘मोवन-ण’. हे विशेषण आहे. मोव करतं ते मोवन किंवा मोवण. मृदु या संस्कृत शब्दापासून मऊ हा जो शब्द प्रमाणभाषेत वापरला जातो, त्याचं बोलीमध्ये, ग्रामीण भाषेत ‘मोव’ असं रूप होतं. अर्थ तोच. जुन्या मराठीतही मोव हा शब्द आढळतो. उदा. ‘भूहून उदक मोव असे।’ – दावि ६०. (अर्थ - जमिनीहून पाणी मऊ असते.) गोव्याकडच्या भाषेत मऊ लागलं की खणायचं या अर्थी ‘मोव असा ये खणता’ अशी म्हण दिसते.  मोवण किंवा मोवाण असाही एक शब्द आढळतो. त्याचा अर्थ आहे - लोणी, मार्दव आणणारा पदार्थ. गुजराती भाषेतही मोवुं असं क्रियापद आहे. त्याचाही अर्थ ओले करणे, थोडेसे भिजवणे, (कणकीत) तेल घालून मिसळणे असा आहे.

एकूणच ‘मऊपणा आणणारा’ तो मोवण-न. उच्चार बदलत – बदलत त्याचा मोहन झाला आहे !





-          सुप्रिया महाजन,
amrutarnav@hotmail.com




Comments

Post a Comment