वल्लभ
लहान मूल म्हणून मला पहिला आठवतो तो वल्लभच. गुहागरला
आई-बाबांची नोकरीची काही वर्षं होतो आम्ही. तेव्हा कै. मधुकाका परचुऱ्यांच्या घरी
काही दिवस राहिलो आणि नंतर एका ठिकाणी राहिलो ते घर डॉ. खाडिलकरांच्या जवळ होतं. ह्या मुलाला, खरं तर बाळाला... शेजारीच राहणाऱ्या
खातू मसालेवाल्यांच्या घरी मी पाहिलं होतं. त्यांची मुलगी शमी माझी मैत्रीण होती. तिच्याशी
खेळायला जाण्यात खरं आकर्षण वल्लभला खेळवण्याचं होतं. आज
आठवणींचे सगळे तुकडे जुळत नाहीयेत, पण बहुतेक त्याच्या आईचं नाव अनिता होतं आणि
त्या माझ्या धाकट्या भावाच्या बालवाडीत शिक्षिका होत्या. आईला आताही विचारलं तरी ती सांगेल सगळं, पण मला तपशील हवेत कुठे ?
वल्लभ
कधीच रडायचा नाही. मस्ती करायचा नाही. मांडीवर घेतलं की शांत रहायचा. मी
त्याच्याशी बोलायचे. त्याला खेळवायला जे काही करत होते असेन त्याला तो कसा
प्रतिसाद द्यायचा ते नाही आठवत मला ... कदाचित् प्रतिसाद देत नव्हता, म्हणून मला ते
आठवतच नाही. खूप नंतर मला कळलं की तो मतिमंद होता ... आई-बाबांची बदली झाली, गुहागर सुटलं. त्यामुळे वल्लभ परत भेटण्याचा प्रश्नच
नव्हता. १२-१५ वर्षांपूर्वी
आई म्हणाली की तो गेला.
मतिमंद
मुलं, त्यांचे प्रश्न वगैरे गोष्टी कळायला लागल्या
तेव्हा मी नंतर मोठेपणी पाहिलेला माझ्या कलाआतेचा मुलगा आठवला, श्री. बापूकाकांचा मुलगा
आठवला,
... त्यांच्या आई-बाबांनी किती प्रकारचे कष्ट सोसले असतील ह्याची कल्पना आली. पण तरीही कधी ती मुलं पाहून
वल्लभची आठवण नाही आली.
लहान मुलांना आपण करतो ते लाड करून घेणारं बाळ आवडतं. नाही तर ते रडलं की घाबरायलाही होतं नि मोठे लोकही ओरडतात. वल्लभच्या बाबतीत माझं असं काहीच कधी झालं नाही. मला वाटायचं की जसा तो मला आवडतो, तशी मी पण त्याला आवडते. म्हणून मोठ्या तोऱ्यात त्याला खेळवायला जात असे. मी भले काळजीने त्याला घेत होते, पण तो रडत-ओरडत नव्हता त्यामागचं कारण वेगळं होतं. वल्लभला प्रतिक्रिया देता येत नव्हती ही खरी गोष्ट ... मला आजही ऐकायला आवडत नाही.

वल्लभ ! आजही तो मी घेतल्यावर न रडणारा गुणी बाळ आहे माझ्यासाठी. ज्या कुठल्या रूपात, जिथे कुठे तो असेल तिथे सुखात राहो.
२९.०३.२०२०
ashi duhkha khari khup mothi..... apalyala vichar karane hi avaghad
ReplyDelete