ॲप



सकाळीच तो कुठेतरी बाहेर निघून गेला होता. कुठे जातोय हे सांगण्याची सवयच नाही. ‘मला कळावं’ ही तिचीही इच्छा आता नसते. आठवडाभरात राहिलेली काही कामं तिने मार्गी लावली आणि दुपारी झोपही काढली. तो नव्हता ... स्वयंपाक कोण करत बसो? म्हणून जेवणाला सुट्टीच होती. काल आठवडा-बाजारात घेतलेल्या ढीगभर भाज्या निवडायच्या होत्या. मग तिनं चहा केला, छानपैकी घरच्या घरी pedicure केलं. खाली जाऊन जे काही आणायचं होतं ते आणलं आणि स्वयंपाकही उरकला संध्याकाळचा.

‘हा म्हणाला तरी वेळेवर येईल असं नाही. त्यापेक्षा भूक लागलीय तर आज जेवूनच घेऊ.’

तिनं गरम भाकरी, झुणका, मिरची-लसणीचा ठेचा वगैरे वाढून घेतलं आणि जेवायला बसली.

‘आज मी वाट नाही पाहणार, तर नेमका लवकर येईल!’

छान झालं होतं सगळं. अर्धी भाकरी जास्त खाल्ली गेली. जेवण झाल्यावर भाजी निवडायला बसली. पाच मिनिटं होतायत न होतायत तोवर बेल वाजली.

‘वाटलंच होतं....’ तिनं दार उघडलं, तोच आला होता. नेहमीसारखा चेहऱ्यावर ‘काऽऽऽय ? काय चाललंय ?’ असं कौतुकाने विचारल्याचा भाव. यांच्या सबंध खानदानात जो – तो भेटला की हाच प्रश्न विचारतो. केव्हातरी ठीक आहे. पण हा रोज ह्याच घरी येतो, ह्याच मला भेटतो....तरी???? बरं, विचारलं म्हणजे काही औत्सुक्य असतं असं नाही, ‘काहीच बोलला नाही’ असा आरोप नको म्हणून तो प्रश्न. तिच्या मस्तकाची शीर तडकते आजकाल हा प्रश्न ऐकून. पण आज ती शांत होती. परत भाजी निवडायला बसली.

तो हातपाय धुवून कपडे बदलून आला, डुलत्या खुर्चीत बसून मोबाईल हातात घेतला.

‘मग ? आज काय केलं ?’

दिवसभरात एकदाही विचारत नाही कधी चुकून, .... आता तो आपल्याला काही विचारत वगैरे नाही, कधी एखादा message पण येत नाही हे रोज – रोज कळून त्याबद्दल काही वाटेनासं झालंय तिला. पण तरी ती आत्ता वैतागली मात्र नाही. तिने नुसता ‘reply’ दिला - ‘काम.’

तो तिच्याकडे काही झालं तर नाही ना याचा अंदाज घेत पाहत  होता. तिला कळत होतं, पण ती भाजी निवडत होती. तो मोबाईलसंगे.... ! तिला ऐकू आलं ‘२१५ मेल्स येऊन पडलेत!’ ते वाक्य अर्थातच तिला उद्देशून नव्हतं. पण तिच्या मनात एक विचार आकार घेऊ लागला.

‘समोरच्या झाडाची फांदी अगदी गॅलरीत आलीय आता. ओंबील यायचे घरात. ह्याला सांगायला हवं, थोडी तोडून टाक म्हणून.’

‘काल डाळिंब छान मिळाली. आत्ताच सोलून ठेवलीयत फ्रीजमध्ये. तेही दोन-दोनदा दाखवावं लागेल. आठवण करावी लागेल...त आणि हातातच नेऊन द्यावं लागेल.

...............

 दिवसभरात किती वेळा याच्याशी बोलायचं होतं मला! ह्यालाच कामास येईल असं कित्ती काही सांगायचं होतं. काल मी ते अर्धवट राहिलेलं लेखन पूर्ण केलं. अगदी छान तार लागली, एका झटक्यात झालं लिहून. हा काल घरात होता. तो असला की माझं मन दुसऱ्या कशात लागत नाही खरं तर. मग काल कसं काय ? तो काय करतोय त्याकडे लक्ष होतंच की माझं.. तो काही म्हणाला आणि मला कळलंच नाही असं एकदाही झाल्याचं आठवत नाही. खरं तर रोजच कुठेही काम करत असताना मनापासून करते, पण तरी मनाशी ह्याचा विचार असतो. त्याची आठवण ही माझ्यासाठी एक नित्य गोष्ट झालीय, जी असतेच. संपतही नाही नि सुरूही होत नाही.’

‘तुला चहा वगैरे हवाय की जेवणारच आहेस?’

‘उं उं ... चहा कर थोडा. जेवण जरा नंतरच.’

चहा घेऊन आली. डुलत्या खुर्चीत कौतुकाने मोबाईलमधलं आलं-गेलं पाहणारा तो तिला हलत्या चित्रासारखा दिसला. दिसतो तर आहे, पण खरा नाही.

‘काहीही मनात येतं आपल्या.’

पण तिला गप्प राहवेना.

‘एक असं ॲप बनवता यायला पाहिजे नै!’

ती काहीतरी बोलतेय हे त्याला कळलं होतं, पण संवाद अचानक तोडता नाही ना येत मोबाईलवरचा...मिनिटभर तसंच. प्रतिक्रियारहित. मग...

‘कसलं ॲप ?’

‘हेच... आपण दिवसभरात किती वेळा कोणाची, कशासाठी आठवण काढली, खरंच काढली का, आपल्याला किती वेळा, कोणाला काही सांगावंसं वाटलं, खरोखर वाटलं की आपलं उगीच?,  कोण उगीचच टिचक्या मारून गेलं.... अशी सगळी नोंद करणारं ॲप?'

तो गोंधळलेला. विषय, वातावरणातलं गांभीर्य नि तिचा सूर एकमेकांशी जुळत नसल्यामुळे गप्प राहून ऐकण्याचा सुरक्षित असा भाव चेहऱ्यावर असलेला.

‘म्हणजे पहा ना, तू रेंजमध्ये आल्यावर तुला कळलं असतं ना की मी तुझी कधी, कशासाठी, किती वेळा आठवण केली होती... खरंच किती वेळा नि उगीचच किती वेळा वगैरे.’

‘पण असं  कसं ॲप करता येईल ?’ रेंजवरचा जोर त्याला कळला होता.

‘हम्.... नाही येणार ना करता. तेच म्हणतेय मी. अशा गोष्टींसाठी नसतंच ते नेमकं.’

शांतता. तो तिच्याकडे पाहतोय नि ती परत भाजी निवडतेय.

‘ज्याची replacement होत नाही, ज्याच्यासाठी काही पर्याय देता नाही ते खूप महत्त्वाचं असतं. पण त्याचं काय एवढं..

त्याला आता कळलं होतं. डुलती खुर्ची पुढे रेलली होती. हाताचे पंजे एकमेकांत गुंतवून प्रश्नार्थक चेहऱ्याने खाली बघत तो काहीतरी विचार करत असावा.

तिच्या मनात आलं की नक्कीच हा मी जे बोलले ते आपल्याकडे आलेल्या लोकांना बोधामृत पाजताना कसं वापरता येईल याचा विचार करतोय.

‘पण आपण ॲपमध्ये सहज मावणाऱ्या नि खरं तर पाच टक्केही खरेपणा नसणऱ्या आभासी जगात रमतो. रेंज नव्हती असं म्हणून त्या जगात दिवसभरात फेरफटका मारता आला नाही म्हणून खोटी खंत दाखवत कधीतरीच दिलेल्या reply ची कारणं देतो ! खरं तर रेंज असतानाही सगळ्याच हाकांना ओ देण्याची आपली इच्छा असते असंही नाही आणि पलिकडच्यालाही फार काही फिकीर पडलेली असते असंही नाही. पण तरी ‘तू महत्त्व दिल्यासारखं कर, मी लक्ष असल्यासारखं करतो’चा खेळ सतत चालू.

मग ज्याने आपली खरंच आठवण काढली असण्याची शक्यता जास्त आहे, ज्याचं आपण नाही म्हणून खरंच काही अडलं असेल, जो कोणी हर एक बाबतीत आपल्याला लागतो ... त्याला आपण असं कधीच छान  feeling का देत नाही?’

दोघंही गप्प. त्याला तिचं म्हणणं कळलं असेल का?

ऐकवून तिलाही थोडंसं बरं वाटलं असावं. मग तिला आठवलं, ‘हा माझा नवरा ‘माझी आवड, माझी पसंत’च्या किती घोषणा देतो. पण वर्षभराची कपड्यांची खरेदी गेल्या ७-८ वर्षांत एकट्याने केलीय का याने? एक तरी कपडा घालून दाखवल्याशिवाय घेतला का? मी नापसंती दाखवली की हा घेत नाही आवडलेला कपडाही....इ.’ ती सुखावली. कारण तिनेही पहिल्यांदाच ही नोंद मनाशी घेतली होती.

...

‘तुला जेवायचंय की नाही?’

‘हो. वाढ ना. बेसनाचा खमंग वास येतोय मगाचपासून.

ती चटकन् उठली.




Comments