अदितीकाकू







श्री. व सौ.अदिती अनिल पाध्ये, भू यांच्या घराजवळचे आगर

शहरी भाषेत सांगायचं तर जवळपास २००० चौरस फुटाच्या, शेणाने सारवलेल्या, झावळ्यांचा मांडव घातलेल्या अंगणात आई-बाबा, मी, पशा आणि अनिलकाका, आबा, तारामाई आणि अदितीकाकू बसलो होतो. कशाला ? ... पावभाजी खायला.

ह्या गोष्टीला २३-२४ तरी वर्षं झाली. अनिलकाका आणि अदितीकाकूचं लग्न होऊन फार दिवस झाले नव्हते. ती खूप हौशी होती. नवनवे पदार्थ करणं तिला आवडत असावं. कऱ्हाड्यांकडे सुगरणीचं कौतुक झालं नाही असं होणं शक्य नाही, त्यामुळे तिचा तो गुणही पुढे चांगला जोपासला गेला नि घरच्यांच्या तब्येतीही. सातपासून तीनपर्यंत ठिपके काढून पंचपाळ्यासारखी रांगोळी तिनेच मला शिकवली. अजूनही ती काढते मी. ... असो. तर, पाध्यांच्या घरात ती कौतुकाची सून आली होती.

एके दिवशी अदितीकाकू पावभाजी करणार आहे आणि आपल्याला बोलावलंय असं आई म्हणाली. जाम उत्सुकता होती की ही पावभाजी असते कसली ? ‘पावाबरोबर भाजी? नाय हो जमायचं!’ इ. रडे सूर मोठीच माणसं लावतात, ... ते लागले. पण तरी रात्री आम्ही गेलो.

‘भू’सारख्या गावात कोणत्याही घरात हा पदार्थ व्हावा असा तो ‘सामान्य’, ‘रोजचा’ झालाच नव्हता. तिथल्या शरदआप्पांच्या हॉटेलातही तेव्हा चहा नक्की मिळे, खायला काय असे ते माहीत नाही, कारण भुवातल्या भुवात कोण कशाला हॉटेलात जातंय? जरी गेलो नाही, तरी आज आठवतं त्यावरून तिथे रावळगाव-कॉफीबाइट-पानपराग ही कागदात गुंडाळलेली चॉकलेटं, लिमलेटच्या-दुधाच्या-मिंटच्या-श्रीखंडाच्या गोळ्या मिळत, खव्याचे लाडू असत, भाजी मिळे, वर्तमानपत्र मिळत असे, मागे पिठाची गिरणी होती... तिथे पावभाजीसारखा मोठ्या शहरांत नुकताच आलेला पदार्थ कुठून असायला? आम्ही तर तो ऐकलाच नव्हता. दुसरं म्हणजे चणे घ्यायला दोन-चार आठवड्यातून एखाद वेळा मिळालेल्या चार आण्याचा रुबाब वाटायच्या सुखात लोळणाऱ्या मला जगदुनियेत कुठे काय खायला मिळतं ह्याची जिज्ञासा असेलच का म्हणून? त्यामुळे इथे नावापासूनच आकर्षणमूल्य असणाऱ्या ह्या पदार्थाची औत्सुक्याने वाट पाहिली जात होती अंगणात.

रोजचं जेवण ताटात व्हायचं. एकेकाचं एकेक ताट. त्या दिवशी पोहे खाण्याच्या ताटलीसारखी एक ताटली नि झाकणासारखी सपाट ताटली अशी दोन-दोन पानं मांडली गेली. कोणाला वाटी, तर कोणाला वाडगा असे पण कोणी  कोणी शेजारी आले. आता अगदी राहवेना. अनिलकाकांनी बेकरीतून पाव आणलेले बहुतेक. पहिल्यांदाच लादीपाव समोर आलेला. पाव भाजीला लावायचा की भाजी पावाला लावायची ? भाजी जास्त की पाव जास्त? रोज तर आई पोळ्या दोन-दोन वाढते, पण भाजी ही इतकी नसते काही... बरं, सगळे काय करतात ते बघू हा उपाय माहीत होता तरी ते बघत थांबायची तयारी नव्हती मुळीच. अशात पुन्हा बाबा बेकरीदर्शन घडवायचे नाहीत, त्यामुळे पावाचं वाढीव आकर्षण... आईशप्पथ ! त्या पावाचाच आनंद इतका वाढला की भाजीच्या चवीची आज आठवणच नाहीये शिल्लक. पण ती पावभाजीची पार्टी अजून जशान् तशी आठवते. 

त्यानंतर मिसळपाव, बटाटेवडे, ढकूभात, इडली सांबार अशा अनेक पार्ट्या झाल्या. अदितीकाकूमुळेच.

तिचं लग्न हे मला आठवणारं पहिलं लग्न. विधी वगैरे काही कळत नव्हतं. पण इतकी माणसं जमलीयत, तासे वाजतायत, ओरडायला-दम द्यायला कोणी उत्सुक नाहीये असं सुखच सुख ...त्यात पुन्हा अनिलकाका आवडीचे होते, कारण बाबा ओरडले की ते ‘तू स्वतः बघ आधी कसा आहेस तो’ असं बाबांना बेधडक ऐकवायचे. त्यांची बायको येणार म्हणून आम्ही जाम खूश!

तिचं गाव दूरचं. उगार. नाव ऐकून उगीचच हसू लोटे. नंतर-नंतर काकू आपल्यासारखं अठ्ठ्याहत्तर नाही, अष्ट्यात्तर म्हणते ते तिच्या गावाचं नाव उगार असल्यामुळे असं ज्ञान पण मला झालेलं. उगीचच काही पण...! काकूकडचे लोक अनिलकाकांच्या घराच्या वरच्या बाजूला दोन खोल्या होत्या तिथे उतरलेले. लग्नाच्या मांडवात यायला आठ-दहा पायऱ्या होत्या.  मुहूर्ताच्या वेळी मांडवात यायला निघालेली, पहिल्या पायरीवर उभी असलेली, मुंडावळ्या बांधलेली, अगदी बारीक... हडकुळी नि काळीसावळी अदितीकाकू तिथे उभी असलेली मला अजूनही आठवते.

मोकळेपणाने हसणारी, टापटीप राहणारी, शिस्तीची, कामसू, हाताला चव असणारी अदितीकाकू ! भीती वाटेल असं कधी वागली नाही, ओरडली नाही. तिची मुलगी अक्षया लहान होती. एकदा समिधाच्या घरी मी चालले तेव्हा मागे लागली. मी घेतली कडेवर आणि खालच्या अंगणात यायला पायऱ्या उतरू लागले. अगदी शेवटच्या पायरीवर पाय घसरला, मी पडले, अर्थात तीही पडली. किती लागलं वगैरे आठवत नाही, पण ती घाबरून रडू लागली. काकूने आम्हाला उचललं नि घरात नेलं. बाबांना कळलं तशी ते खाली आले, काय झालं ते कळल्यावर मारूच लागले. अदितीकाकू मधे पडली म्हणून मी वाचले, मग दुपारभर तिने मला घरी पाठवलं नाही.

मला सांडगी मिरची खूप आवडते. ती तळत होती. मी खूप डिंगा मारल्या की मी तर नुसती मिरची पण खाईन....तिला वाटलं असेल की ‘खा म्हटल्यावर तिखट मिरच्या ही खाणार नाही’. पण मला कुठे अक्कल होती? ‘हं, दाखव खाऊन’ असं म्हणत तिने मिरच्यांची बशी माझ्यापुढे सरकवली. मी खाऊ लागले. डोळ्यातनं पाणी वहायला लागलं,  ... पण प्रश्न मानाचा होता! तिनेच बिचारीने पड खाल्ली. ‘तूच जिंकलीस बायो! हे घे, पी आता’ असं म्हणत हातात ताक दिलंन नि बशी उचललीन. मी ताक प्याले नि गप्पणीं निघून गेले. इतकं तिखट लागलेलं की काही सुचत नव्हतं. 

आईला तांदळाची भाकरी तिनेच शिकवली, त्यामुळे आई कर्नाटकातल्यासारख्या छोट्या नि पातळ भाकऱ्या करते.

काही वर्षांपूर्वी भूला रस्त्यालगतच्या त्यांच्याच जागेत अनिलकाकांनी ‘स्वामी समर्थ ढाबा’ सुरू केला. मला माहितेय, अनिलकाकांच्या संसाराप्रमाणे त्या ढाब्याचा कणाही अदितीकाकूच असणार!

-          सुप्रिया महाजन, २९.०३.२०२०


स्वामी समर्थ ढाबा, भू

काजूगरांची उसळ नि तांदळाची भाकरी - स्वामी समर्थ ढाबा, भू 



आता नवीन चालू


Comments