आज एक कविता. खरं तर दहा वर्षांपूर्वी लिहिली होती. आजुबाजूच्या वातावरणाचे मनात पडसाद उमटतात. नकळत त्याचं काहीतरी रूप तयार होतं. तसं जेव्हा झालं तेव्हा ती लिहिली गेली.
काल हाती लागली. काल मोठी एकादशी. सण असला की निदानपक्षी संबंधित गाणी लावून तरी साजरा करतो आपण. काल अभंग पण लावायची इच्छा झाली नाही. सगळं समाजमन कोंडलंय असं वाटत रहातं.
वर्तमानात बोलायचं झालं तरी वर्षभरापूर्वीच्या पाव किलोच्या किमतीत २००ग्रॅम विकत घेताना किंवा मग घेताना चांगलाच विचार पडेल अशा रीतीने पाव किलोचा भाव देताना, नक्की गरज आहे ना असा सतरादा विचार करून बाहेर जाऊन काम करू आल्यावर बड्या लोकांनी घेतलेल्या सभांच्या गोष्टी ऐकताना, आपण निवडून दिलं नाही तरी ...पणा करून डोक्यावर सत्ता लादलेली बघताना, त्यातले निम्मे निकम्मे आणि निम्मे अपराधी ठरत असताना.... उद्वेग दाटतो. ते सगळं आम्हा जनतेला वाटतं. त्या वाटण्यातून काल शेवटचा भाग लिहिलाय.
बा विठ्ठलासारख्या सरळ मनाच्या, मऊ हृदयाच्या देवाला ही टगेगिरी संपवायला यायला का लावायचं? का त्याला त्रास? आपला भक्त संकटात म्हणून त्यानेच धावायचं? आमचा देव अंधारात म्हणून आम्ही कधी लावणार दिवा?
आळंदीत ज्ञानदेवांची संजीवन समाधी आहे, स्मारक नव्हे. ते आहेत. जिवंत! आमच्यासारख्या अनेक चेहरा नसलेल्या, सशाच्या काळजाच्या कोट्यवधी जनतेच्या मनात ते जिवंत आहेत. आमच्या मनातल्या श्रद्धेचं, चांगुलपणाचं, स्वच्छ नि साध्या इच्छांचं नाव आहे ज्ञानदेव!
भंपक, स्वार्थी लोकांनो, त्यांना सामोरं जायची वेळ आली तर ...
ज्ञानदेव उवाच
(इ. स. १२९६)
उपेक्षिल्यांसाठी । केली आटाआटी ।।
देववाणी दारी । दुभविली || १ ||
वेदांचाही अर्थ । कळविला जना।
मराठीचा पान्हा । वत्सामुखीं || २ ||
गुरुप्रसादानें। शब्दांचियां खाणी।
खोदोनिया जनी | लूटविल्या ।।3||
धन्य झालो आम्ही । करविलें काज |
भक्तांचिया चोजा । पूरविण्या ।।४।।
आकळली खूण । अंतरी आत्म्याची |
वाट परतीची। दिसो लागे ।।५।।
(इ.स. २०११)
बरें झाले देवा । घेतली समाधी ||
सुचविण्यासाठी | धन्यवाद !' ||६||
नव्हती केलेली । कल्पना कधीही ।
पहावे लागेल । असे काही ।।७।।
नाव घेता माझे । खवळती जन ||
मराठीचे प्राण । वाचविण्या ||८||
जिंकवण्यासाठी । कुणाला कुणीही।
मराठीची कास । धरतात ।।९||
शहाणे करती | मतांचा व्यापार |
कुणा मराठीचें । पडलेसें ।। १० ||
शिकले बोलती । परक्याची भाषा ।।
अशिक्षित मागे | धावताती ।। ११ ||
किती कोटी लोक । बोलती मराठी (?)||
लिहती मराठी | किती कोटी(?) ||१२||
मिळतात मते । मिळतात जागा ||
केवढी किंमत । मराठीची ||१३||
असतो जर का । येथे आजमिती |
असते कां यांनी । विचारलें ||१४||
करिती भाषणें | 'ज्ञानदेव म्हणे' ||
अर्थाचेच उणे | शब्दांमाजी !।।१५||
असतो राहिलो । जरी आज देवा ।।
विकते हे लोक। लिलावात ||१६।।
त्यावर ठरता । माझा भाव देवा।
अंतरीचा भाव । अभावात ||१७||
मज वापरून । करते तस्करी ||
तस्कर पुढारी | जातिवंत ||१८||
लागली असती | मजपुढे रांग ।
देण्या अनुदान । मठासाठी ||१९।
लागले असते । मजपाठी लोक ।
'आमच्या राज्यात । समाधी घ्या' ||२०||
काय सांगू देवा । घाबरला जीव ।
सत्याचा हा रंग । भयंकर ||२१||
अंगावर येते | नवे तत्त्वज्ञान ।
त्याहून अज्ञान | परवडे ||२२||
तेव्हांचे ते जन । वाट चुकलेले।
हे तर आवडी । चुकतात ।।२3||
कल्पनाही नको । यांच्या संगतीची।
देखोनिया सारे। विटलो रे ||२४||
घेण्या तू लाविली | जिवंत समाधी ।
सुचविण्यासाठी । धन्यवाद ! ||२५।।
(इ.स. २०२१)
काय रे हे देवा । करू काय तुझे ।
मज झाले ओझे । समाधीचे ।
मला 'माणसाला'। समाधीची सोय ।
स्वतःसाठी काय । ठरवले ?।
तुला वाटले का । देव तू म्हणून ।
तुझे 'भक्तजन' । सोडतील?
खुळा रे तू बाबा । तुला गंडवले ।
'माऊली' म्हणाले । फसलास!
तुझ्या 'दर्शनाला' । हवेतून आले ।
गाडीतून गेले । मोठे भक्त ।
वाटले तुलाही । केवढी ती भक्ती ।
तूच एक जगी । भाग्यवंत ।
युगे २८ । बायकोशी वाद ।
घालून तू आज । गंडलास ।
तुला दाराआड । 'त्यांना' गजाआड ।
करणारे द्वाड । सिंहासनी !
आता गेले सारे । हातून तुझ्याही ।
पूजा घे करून । मुकाट्याने ।
यांनी जनतेला । वाटेला लावले ।
ना तुला जमले । युगे २८।
काळजी घे देवा । थोडी सोस कळ।
तुझे बळ आम्हां । जनतेत ।
सोडवू तुलाही । सुटू आम्ही पण ।
समाधीत ज्ञाना । जागा आहे ।
क्या बात है... भारी
ReplyDeleteKupach chhan👌
ReplyDeleteKharach kai chan lihita tumhi ...🙏🌷🌹
ReplyDelete